सेवेत कायम करण्याच्या मागणीला धरून समग्र संघर्ष समिती द्वारे ९ मार्च पासून आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषण…..
* जिल्ह्यातील समग्र शिक्षा अभियानातील ८० कंत्राटी कर्मचारी आझाद मैदानाच्या उपोषणात....

गोंदिया, (दि. ९): समग्र शिक्षा अभियानांतर्गत गेल्या २५ वर्षांपासून तुटपुंज्या मानधनावर कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत समायोजित करून कायम करण्याच्या मागणीसाठी समग्र शिक्षा संघर्ष समितीने आझाद मैदान, मुंबई येथे सोमवार (दि.९ मार्च २०२६) पासून बेमुदत उपोषण पुकारले आहे. समग्र शिक्षा अभियानातील विविध केडरमधील ३ हजार ३७८ कंत्राटी कर्मचारी अनेक वर्षांपासून शासनाकडे सेवेत कायम करण्याची मागणी करीत आहेत. या मागणीसाठी यापूर्वीही अनेक आंदोलने करण्यात आली होती. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन केली होती. या समितीने २५ नोव्हेंबर २०२५ रोजी शासनाकडे सकारात्मक अहवाल सादर केला आहे.

या अहवालातील शिफारस ‘ब’ मंजूर करून सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यात यावे, या मागणीसाठी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान यशवंत स्टेडियम येथे ८ ते १२ डिसेंबर २०२५ दरम्यान सुमारे ३००० कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषण केले होते. त्या वेळी आचारसंहिता संपल्यानंतर लगेच निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र आचारसंहिता संपूनही अद्याप कोणताही निर्णय न झाल्याने संतप्त कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा ९ मार्च २०२६ पासून आझाद मैदान, मुंबई येथे आंदोलन सुरू केले आहे. ३ हजार कंत्राटी कर्मचारी उपोषणात सहभागी झाले आहेत. शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
गोंदिया जिल्ह्यातील ८० कंत्राटी कर्मचारी कामबंद आंदोलनात..
जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत समग्र शिक्षा अभियानात कार्यरत एकूण ८० कर्मचारी या आंदोलनात सहभागी असून सर्वांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. सर्व कर्मचारी हे मुंबई करिता रवाना झाले असून शिक्षण विभागातील महत्त्वाचे कामे समग्र शिक्षा अभियानावर अवलंबून असतात त्यामुळे हे कर्मचारी आंदोलनात गेल्याने सर्व कामे खोळंबणार असल्याची माहिती समग्र शिक्षा चे सहायक कार्यक्रम अधिकारी तथा संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष दिलीप बघेले यांनी प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.







