शिक्षणाधिकारी म्हणून पवन खंदारे रुजू ; 7 वर्षानंतर मिळाले गोंदियाला पूर्णवेळ शिक्षणाधिकारी
♦️ विद्यार्थी गुणवत्ता व शिक्षक हीत हेच ध्येय - पवन खंदारे

♦️ समग्र शिक्षा संघर्ष समिती द्वारे रोपटे देऊन स्वागत
गोंदिया, (दि. 21): गोंदिया जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाला सात वर्षानंतर पूर्णवेळ शिक्षणाधिकारी मिळाले असून पवन खंदारे हे प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून नुकतेच जिल्हा परिषद गोंदिया येथे रुजू झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षणाला नवी दिशा व गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
केमिकल इंजिनियर असलेले पवन खंदारे हे जिल्हा परिषद शिक्षकाचे सुपुत्र असून त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची शिक्षणाधिकारी पदाची परीक्षा 2022 मध्ये उत्तीर्ण करून आपला दोन वर्षांचा प्रोबेशन कालावधी पूर्ण केल्याने त्यांची नियुक्ती गोंदिया जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून शासनाने केली आहे. नुकताच त्यांनी प्रभारी शिक्षणाधिकारी विशाल डोंगरे यांचेकडून पदभार स्वीकारला आहे. जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थी गुणवत्ता व शिक्षकांचे हीत जोपासून उत्तम कार्य करणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी व्यक्त केले आहे.
विविध शिक्षक संघटना व कर्मचारी यांचेद्वारे स्वागत : जिल्ह्याला पूर्णवेळ शिक्षणाधिकारी मिळाल्यामुळे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक समिती, प्राथमिक शिक्षक संघ, समग्र शिक्षा संघर्ष समिती व शिक्षण विभागातील कर्मचारी यांनी त्यांचे स्वागत केले आहे. शिक्षकांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावून विद्यार्थी गुणवत्ता वाढवावी असे आवाहन शिक्षणाधिकारी पवन खंदारे यांनी उपस्थित शिक्षकांना व कर्मचाऱ्यांना केले आहे.









