सकारात्मक शिस्त अभियानात १ लाख ३५ हजार शिक्षकांचे झाले प्रबोधन; राज्यभरात ३,७०० शिक्षण परिषदांमधून ‘सकारात्मक शिस्ती’चा जागर*
♦ शालेय शिक्षण मंत्री ना. दादाजी भुसे यांच्या संकल्पनेतून राबवला जातोय विशेष अभियान...

मुंबई, (दि. 5 जानेवारी): विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य जपणे, त्यांची सुरक्षा निश्चित करणे आणि शिक्षक-विद्यार्थी नाते बळकट करणे, या उद्देशाने शालेय शिक्षण विभागाने हाती घेतलेले ‘सकारात्मक शिस्त’ अभियान राज्यात यशस्वी ठरले आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री ना. दादाजी भुसे यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनात राबविण्यात आलेल्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत राज्यभरात ३,७०० शिक्षण परिषदांचे आयोजन करण्यात आले असून, तब्बल १ लाख ३५ हजार ३३९ शिक्षकांना ‘सकारात्मक शिस्ती’चे धडे देण्यात आले आहेत.

अलीकडच्या काळात काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांवरील शारीरिक शिक्षेच्या घटना समोर आल्याने शिक्षक-विद्यार्थी नाते अधिक दृढ करण्यासाठी या अभियानाची आखणी करण्यात आली.
*काय आहे ‘सकारात्मक शिस्त’?*
केवळ शिक्षा करून शिस्त लागत नाही, तर ती विद्यार्थ्यांच्या मनावर भीती निर्माण करते. याउलट, ‘सकारात्मक शिस्त’ ही एक विज्ञानाधारित पद्धती आहे. यामध्ये विद्यार्थ्यांवर दंडाचा बडगा न उगारता, त्यांच्याशी संवाद साधणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि समुपदेशनाच्या माध्यमातून त्यांना जबाबदारीची जाणीव करून देणे यावर भर दिला जातो.
*अभियानाची यशोगाथा:*
या अभियानाची अंमलबजावणी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आली. सर्वप्रथम राज्यातील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांचे (DIET) प्राचार्य आणि प्राथमिक-माध्यमिक शिक्षण अधिकारी यांचे उद्बोधन करण्यात आले. त्यानंतर राज्यभरात गावपातळीपर्यंत शिक्षण परिषदांच्या माध्यमातून शिक्षकांपर्यंत हा विचार पोहोचवण्यात आला. या अभियानाचा प्रसार व प्रचार व्यापक पातळीवर करण्यासाठी प्रसारमाध्यमांचाही प्रभावी वापर करण्यात आला.
या अभियानाच्या यशाबद्दल बोलताना शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे म्हणाले की, “विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य आणि सुरक्षा ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. शाळांमध्ये शारीरिक किंवा मानसिक शिक्षेला थारा न देता, मुलांशी संवाद साधून आणि त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना घडवणे, हेच ‘सकारात्मक शिस्त’ अभियानाचे मुख्य सूत्र आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी आदरयुक्त नाते निर्माण करावे आणि शाळेत भयमुक्त वातावरण ठेवावे, जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये आत्मशिस्त आणि जबाबदारीची भावना नैसर्गिकरित्या विकसित होईल. या अभियानाला शिक्षकांकडून मिळालेला प्रतिसाद उत्साहवर्धक असून, यामुळे नक्कीच शाळांमध्ये एक सहकार्यपूर्ण आणि आनंददायी वातावरण निर्माण होईल.”
पहा व्हिडीओ 👇👇👇







