जिल्ह्यातील 7981 परीक्षार्थीनी दिली शिक्षक पात्रता चाचणी (MAHA TET) परीक्षा; 33 केंद्रावर परीक्षा सुरळीत…
♦️दोन्ही पेपर मिळून 434 परीक्षार्थींची परीक्षेला दांडी; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे अंदाजे 2000 कार्यरत शिक्षकांनीही दिली TET परीक्षा.

♦ दोन्ही पेपर मिळून 434 परीक्षार्थींची परीक्षेला दांडी; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे अंदाजे 2000 कार्यरत शिक्षकांनीही दिली TET परीक्षा.
गोंदिया, (दि.23): महाराष्ट्र शासनाच्या राज्य परीक्षा परिषदेद्वारे आयोजित महा टीईटी शिक्षक पात्रता परीक्षेत जिल्ह्यातील 7981 परीक्षार्थीनी 33 केंद्रावर आज (23) परीक्षा दिली. त्यात दोन्ही पेपर मिळून 434 परीक्षार्थी हे अनुपस्थित असल्याची माहिती जिल्ह्याचे नोडल/नियंत्रण अधिकारी तथा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) विशाल डोंगरे यांनी दिली आहे.
शिक्षक पात्रता परीक्षेसाठी पेपर 1 करिता एकूण 16 केंद्रावर 4145 परीक्षार्थीनी तर पेपर दोन करिता एकूण 17 केंद्रावर 4270 परीक्षार्थीनी नोंदणी केलेली होती त्यापैकी पेपर एक ला 3923 तर पेपर दोन ला 4058 असे एकूण 7981 परीक्षार्थी सहभागी झाले. परीक्षेला दोन्ही पेपर मिळून 434 परीक्षार्थी अनुपस्थित राहिले.
परीक्षा केंद्रावर CCTV सह प्रशासनाची होती खास नजर : मागील TET महा घोटाळ्यानंतर शासनाने TET परीक्षा अधिक कडक करण्याचा निर्धार केल्याने यावर्षी प्रत्येक परीक्षा केंद्रावर प्रत्येक हॉल मध्ये CCTV कॅमेरे लावले होते. तसेच प्रत्येक परीक्षार्थिंची बायोमेट्रिक पद्धतीने उपस्थिती घेण्यात आली. CCTV कॅमेऱ्यावर जिल्हाधिकारी कार्यालय व पुणे येथील परीक्षा परिषदेच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची नजर होती. सोबतच जिल्हाधिकारी प्रजित नायर व मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरूगानंथम यांनी स्वतः निवडक परीक्षा केंद्राला भेटी दिल्या व पाहणी केली.
डायट प्राचार्यसह माध्यमिक शिक्षणाधिकारी व तहसीलदार यांचेही भरारी पथक: जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदिया ची प्राचार्य राजकुमार हिवारे, जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (माध्यमिक) संदेश जाधव तसेच तहसीलदार समशेर पठाण व श्री कांबळे यांनीही आपल्या पथकाद्वारे परीक्षा केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. जिल्ह्यातील कोणत्याही परीक्षा केंद्रावर गैरमार्गाचा अवलंब करणारे परीक्षार्थी आढळून आले नाहीत.
कार्यरत शिक्षकांनीही दिली परीक्षा: सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयामुळे सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा लागू केली असल्याने जे कार्यरत शिक्षक आहेत त्यांनाही ही परीक्षा द्यावी लागेल तरच ते आपल्या सेवेत कायम राहतील व प्रमोशन देखील मिळेल अशा आशयाचे निर्णय आल्यामुळे कार्यरत शिक्षकांना आपली सेवा धोक्यात असल्याचे जाणवू लागल्याने जिल्ह्यातील अंदाजे दोन हजार शिक्षकांनी टीईटी परीक्षा दिली असल्याचा अंदाज आहे. या निर्णयाविरोधात सर्व शिक्षक संघटना एकवटल्या असून शासनाने रिव्हू पिटीसन दाखल करावी अशी मागणी केली आहे. तरी देखील काही कार्यरत शिक्षकांनी आपण किती पाण्यात आहोत हे पाहण्यासाठी सदर टीईटी परीक्षा दिली आहे. नेहमी मुलांची परीक्षा घेणारेच गुरुजी TET परीक्षेत किती पास होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दिव्यांगाना अधिकचा वेळ देण्यास टाळाटाळ : दिव्यांग परीक्षार्थीना नियमानुसार एका तासाला 20 मिनिटे अधिकचा वेळ द्यावा असे निर्देश असुनदेखील पहिल्या पेपर ला काही केंद्रावर दिव्यांग परीक्षार्थीना अधिकचा वेळ देण्यास टाळाटाळ झाली असल्याचे स्वतः परीक्षार्थीनी प्रतिनिधीला सांगितले आहे.
प्रतिक्रिया
“जिल्ह्यात महा टीईटी परीक्षा सुरळीत पार पडली असून कुठलाही गैरप्रकार झालेला नाही. सर्व यंत्रणेने खूप छान काम केले. दिव्यांग परीक्षार्थीबाबत सर्व सूचना व निर्देश देण्यात आले होते. ज्यांनी लेखणीकाची मागणी नोंदणीच्या वेळी केली होती त्यांना लेखणीक देण्यात आले. इतर दिव्यांग परीक्षार्थीच्या बाबतीत फॉर्म नं. 4 भरून ज्यांनी ज्यांनी मागणी केली त्यांना अधिकचा वेळ देण्यात आलेला आहे.” – विशाल डोंगरे, शिक्षणाधिकारी (प्राथ.), जि. प. गोंदिया.
महा टीईटी परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी प्रजित नायर व मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरूगानंथम यांचे मार्गदर्शनात जिल्हा नियंत्रण अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी विशाल डोंगरे, सह नियंत्रण अधिकारी माध्यमिक शिक्षणाधिकारी संदेश जाधव, जिल्हा परिरक्षक उपशिक्षणाधिकारी डी. बी. दिघोरे, एन. जी. डहाके, झोनल अधिकारी म्हणून डायट चे वरिष्ठ अधिव्याख्यात डॉ. नरेश वैद्य, उपशिक्षणाधिकारी महेंद्र मोटघरे, गट शिक्षणाधिकारी सुकचंद वाघमारे, लक्ष्मण चव्हाण, सहाय्यक परिरक्षक म्हणून विस्तार अधिकारी (शिक्षण) अनिल चव्हाण, एस. आर. बागडे, ए. एस. बरयेकर, डी. बी साकुरे, पूर्णिमा विश्वकर्मा व इतर केंद्रप्रमुख यांनी विशेष सहकार्य केले.







