कंत्राटी व्यवस्थेचा आणखी एक बळी: आझाद मैदानावरील समग्र शिक्षा आंदोलक सौदागर वाघमारे यांचे हृदयविकाराने निधन…
सोलापूर मनपा येथे विषय साधनव्यक्ती या पदावर होते कंत्राटी म्हणून कार्यरत....

मुंबई/गोंदिया: गेल्या अनेक वर्षांपासून शासकीय सेवेत कायम होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या पुन्हा एका लढवय्या नेतृत्वाचा अंत झाला आहे. महानगर पालिका सोलापूर येथे विषय साधन व्यक्ती म्हणून कार्यरत असलेले श्री सौदागर गोविंद वाघमारे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज (१६) निधन झाले. आझाद मैदानावरील संघर्षातून घरी परतताच काळाने त्यांच्यावर झडप घातली, ज्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची तसेच भीतीची लाट उसळली आहे.

*आंदोलनाचे चटके आणि व्यवस्थेची अनास्था:*: ९ मार्च २०२६ पासून मुंबईच्या आझाद मैदानावर आपल्या न्याय्य हक्कांसाठी कंत्राटी कर्मचारी लढा देत आहेत. स्व. सौदागर वाघमारे देखील या आंदोलनात हिरीरीने सहभागी झाले होते. मात्र, “अर्ध्या कर्मचाऱ्यांना न्याय आणि अर्ध्यांना वाऱ्यावर” या सरकारच्या दुजाभाव करणाऱ्या धोरणामुळे ते प्रचंड मानसिक तणावाखाली होते. “आपण कधी कायम होणार? आपल्या कुटुंबाचे भवितव्य काय?” या विवंचनेने त्यांना ग्रासले होते. आंदोलनादरम्यान अस्वस्थ वाटू लागल्याने ते आपल्या पत्नी आणि मुलाबाळांच्या भेटीसाठी गावाकडे गेले, तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली.
*हा नैसर्गिक मृत्यू की ‘संस्थात्मक हत्या’?*: वाघमारे सरांचा मृत्यू हा केवळ नैसर्गिक अपघात नसून, तो अनिश्चिततेने आणि मानसिक छळाने घेतलेला बळी आहे, अशी भावना कर्मचारी व्यक्त करत आहेत.
“ज्या शाश्वत नोकरीचे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी आयुष्याची उमेदीची वर्षे खर्च केली, ते स्वप्न पूर्ण होण्याआधीच व्यवस्थेच्या दिरंगाईने त्यांचा बळी घेतला,” अशा शब्दांत सहकाऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
*बळींचा आकडा २५९ वर; सरकारला जाग कधी?: समग्र शिक्षा योजनेत कंत्राटी म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मृत्यूचे सत्र थांबायला तयार नाही. सौदागर वाघमारे यांच्या निधनासह आतापर्यंत तब्बल २५९ कंत्राटी कर्मचाऱ्यांचा नोकरीत असताना मृत्यू झाला आहे. हे मृत्यू उघड्या डोळ्यांनी पाहणारे ‘मायबाप’ सरकार आणखी किती बळींची वाट पाहत आहे? असा जळजळीत प्रश्न आता उपस्थित होत आहे.
*लढा अधुरा, पण जिद्द कायम..*: सौदागर वाघमारे सरांचे जाणे ही संघटनेची आणि त्यांच्या कुटुंबाची कधीही भरून न निघणारी हानी आहे. त्यांच्या निधनामुळे सोलापूर व लातूर जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
“स्व. वाघमारे सरांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. ज्या हक्कासाठी त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष केला, तो आझाद मैदान, मुंबई येथील लढा आता अधिक तीव्र करू,” असा निर्धार आंदोलक कंत्राटी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे.







