छोटया छोट्या प्रयोगातूनच उद्याचे वैज्ञानिक घडणार – CEO एम. मुरूगानंथम
🛑 अटल टिंकरिंग लॅब (ATL ) शिक्षक व विद्यार्थी प्रकल्प प्रदर्शनाचे थाटात आयोजन...

गोंदिया, (दि. 7 मार्च ): केंद्र शासनाच्या नीती आयोगाद्वारे देशभरातील निवडक शाळांना टिंकरिंग लॅब पुरविण्यात आल्या असून इयत्ता दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना कोडिंग, रोबोटिक्स, थ्रीडी प्रिंटर, ड्रोन टेक्नॉलॉजी, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, मायक्रो प्रोसेसर, इत्यादी विषयांची माहिती व प्रात्यक्षिक माहिती मिळविण्यासाठी अटल टिंकलिंग लॅब ची स्थापना करण्यात आली. अटल टिंकरिंग लॅब असलेल्या शाळांमधील शिक्षकांचे सहा टप्प्यांमध्ये प्रत्येक महिन्याला तीन दिवस असे एकूण 18 दिवस जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदिया द्वारे लेंड अ हॅन्ड संस्थेचे राज्य प्रशिक्षक उदय कुलकर्णी यांचेद्वारे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणानंतरचा पुढील टप्पा म्हणून या शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी यांनी तयार केलेले प्रकल्पांचे प्रदर्शन आज (दि. 5) ला स्थानिक पी.पी कॉलेज ऑफ एज्युकेशन येथे आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी उद्घाटकीय मुख्य अतिथी म्हणून जिल्हा परिषद गोंदिया चे मुख्य कार्यकारी अधिकारी एम मुरुगानंथम यांनी विद्यार्थ्यांना अत्यंत मोलाचे मार्गदर्शन करून या आयोजनातील छोट्या छोट्या प्रयोगातूनच भविष्यातील वैज्ञानिक घडणार असे प्रतिपादन केले.


प्रदर्शनाचे आयोजन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य राजकुमार हिवारे यांच्या अध्यक्षतेखाली तर संस्थेचे वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. नरेश वैद्य, पी. पी. शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एल. निकोसे, जूनियर कॉलेज ऑफ एज्युकेशनचे प्राचार्य फुलीचंद दखणे, लेंड अ हॅन्ड संस्थेचे जिल्हा प्रतिनिधी ऋतुंबरा लोगडे यांच्या प्रमुख उपस्थित पार पडले.
प्रकल्प प्रदर्शनात भंडारा जिल्ह्यातील 7 व गोंदिया जिल्ह्यातील 22 अशा एकूण 29 शाळांनी सहभाग घेतला होता. प्रत्येक शाळेने इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, डिजिटल लिटरसी आणि थीम बेस्ड अशा चार विषयावर चार प्रकल्प असे एकूण 116 प्रकल्पांची मांडणी करण्यात आली होती. प्रत्येक शाळेतील तीन शिक्षक व आठ विद्यार्थी असे एकूण 300 व्यक्ती उपस्थित होते. या सर्व प्रकल्पांचे परीक्षण शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील अधिव्याख्याता प्रा. नरेश बेसेकर व प्रा. भूपेंद्र देशमुख, डीबी सायन्स कॉलेज गोंदियातील प्राध्यापिका विना गौतम, अध्यापक विद्यालय दांडेगाव येथील डॉ. प्रशांत गणवीर व गोंदिया येथील दिलीप पडोळे यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. नरेश वैद्य यांनी करून प्रदर्शनाची संपूर्ण रूपरेखा विषद केली. प्राचार्य डॉ. आर. एल. निकोसे, समन्वयक ऋतुंबरा लोगडे यांनी विद्यार्थ्यांना यथोचित असे मार्गदर्शन केले. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य राजकुमार हिवारे यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून समाजासाठी विज्ञानाचा उपयोग करावा असे आवाहन केले.
समारोपीय कार्यक्रमात जिल्हा परिषद गोंदियाचे प्राथमिक शिक्षणाधिकारी विशाल डोंगरे व माध्यमिक शिक्षणाधिकारी सुधीर महामुनी यांनी उपस्थित राहून विजेत्या विद्यार्थी व शाळांना ट्रॉफी व प्रमाणपत्राचे वाटप केले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन साधनव्यक्ती कु. अंकला माने व वशिष्ठ खोब्रागडे यांनी केले तर आभार भाष्कर बाहेकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लेंड अ हॅन्ड इंडिया चे प्रतिनिधी ईश्वर मुंडले, सुभाष नंदुरकर, विषय साधनव्यक्ती बी. डी. चौधरी, डी. जी. हरडे, खुमेशकुमार कटरे, अनिता ठेंगडी, उर्मिला वैद्य, कुमुदिनी घोडेश्वार, शालिनी रहांगडाले, पी. पी. कॉलेज चे प्राध्यापक खंगार, प्राध्यापिका बघेले, डहाके व इतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
हे ठरले प्रदर्शनातील विजेते :
इलेक्ट्रॉनिक्स गटात प्रथम क्रमांक – विवेक मंदिर सी बी एस.ई, गोंदिया,
द्वितीय – मनोसुमन पब्लिक स्कुल पवनी, भंडारा,
तृतीय – श्री महावीर मारवाडी स्कुल गोंदिया,
मेकॅनिकल गटात प्रथम क्रमांक-श्रीमती एस एस एस महिला समाज हायस्कुल भंडारा,
द्वितीय -मॉडेल कॉन्व्हेंट गोरेगाव,
तृतीय – श्रीराम विद्यालय खमारी,
डिजिटल लिटरसी या गटात प्रथम क्रमांक – मॉडेल कॉन्व्हेंट गोरेगाव,
द्वितीय – छत्रपती शिवाजी विद्यालय, देवरी,
तृतीय क्रमांक – श्रीमती यु. एम. संग्रामे विद्यालय नवेगावबंध,
थीम बेस्ड या गटात प्रथम क्रमांक – हरिहरभाई पटेल हायस्कूल चिरचाळबंध,
द्वितीय क्रमांक – विवेक मंदिर हायस्कुल गोंदिया,
तृतीय क्रमांक – श्री महावीर मारवाडी हायस्कूल गोंदिया







