एकच नारा कायम करा’ या घोषणेने दुमदूमला यशवंत स्टेडियम; अन्नत्याग आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी 5 आमदारांची भेट…..
♦️समग्र शिक्षा कर्मचाऱ्यांच्या रास्त आंदोलनाला पाठिंबा....

समग्र शिक्षा कर्मचाऱ्यांच्या रास्त आंदोलनाला पाठिंबा….
नागपूर,(दि. 8): महाराष्ट्र राज्य समग्र शिक्षा योजनेतील कंत्राटी कर्मचार्यांना शासन सेवेत सामावून घ्यावे नाही तर स्वेच्छा मरणाची परवानगी द्यावी या मागणीसाठी समग्र शिक्षा संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य द्वारे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर बेमुदत अन्नत्याग आमरण आंदोलन यशवंत स्टेडियम येथे सुरु केले. त्यात एकच नारा कायम करा’ या घोषणेने संपूर्ण यशवंत स्टेडियम दुमदूमला. आज पहिल्याच दिवशी आंदोलन स्थळाला 5 आमदारांनी भेट देऊन समग्र शिक्षा कर्मचाऱ्यांची मागणी रास्त असून आमचा तुम्हाला पाठिंबा आहे असे जाहीर केले.

नागपूर येथे हिवाळी अधिवेशना दरम्यान समग्र शिक्षा करार कर्मचारी संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने आजपासून आंदोलन सुरु झाले आहे. हे कर्मचारी अन्नत्याग आंदोलन, शंखनाद, थाळी नाद, घंटानाद, टाळी आक्रोश, भिक मांगो, मूक आंदोलन आणि आत्मक्लेश आंदोलन करणार आहेत. आंदोलनाला सुरवात झाल्यानंतर लगेच अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण, गडचिरोली आरमोरीचे आमदार रामदास मसराम, किशोर जोरगेवार, शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, अहिल्यानगर श्रीरामपूरचे आमदार हेमंत उगले यांनी उपोषण स्थळाला भेट देऊन कर्मचाऱ्यांची शासन सेवेत समायोजनाची मागणी रास्त असून विधिमंडळात याबाबत आपण नक्कीच आवाज उठवू व तुम्हाला कायम करण्यासाठी शासनाला भाग पाडू असे आश्वासन दिले.

शासनाने दिली सावत्रपणाची वागणूक: याच अभियानात कार्य करणारे दिव्यांग कंत्राटी विशेष शिक्षक, समावेशित शिक्षण तज्ञ् (विशेष तज्ञ्), जिल्हा सक्षमीकरण समन्वयक अशा 3000 हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना मागील वर्षी केंद्रस्तरावर विशेष शिक्षक या पदावर नियमित सेवेत समायोजन केले परंतू त्यांच्या सोबतच 20 वर्षे सेवा देणाऱ्या या इतर समग्र शिक्षा कर्मचाऱ्यांना तसेच कंत्राटी ठेवले. त्यामुळे या कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष उफाळला आहे. इतकेच काय तर या अभियानात ज्यांनी एक/दोन/ महिना, वर्ष काम केले व नंतर कंत्राटी नोकरी सोडून दिली तसेच ज्या कर्मचाऱ्यांना ज़िल्हा परिषदेने विविध कारणांमुळे नोकरीतून काढून टाकले होते अशाही कर्मचाऱ्यांना शासन आता सेवेत समायोजन करीत आहे. त्यामुळे शासन एकाला आईचा आणि एकाला मावशीचा अशा सावत्रपणाच्या धोरणाचा अवलंब करीत असल्याचा आरोप देखील या उर्वरीत कर्मचाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे आतातरी या उर्वरित समग्र शिक्षा कर्मचाऱ्यांना शासन सेवेत कायम करावे अन्यथा स्वेच्छामरणाची परवानगी द्यावी हीच मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

आजपासून सुरु झालेल्या आंदोलनात राज्यभरातून 2000 कंत्राटी कर्मचारी उपस्थित होते. आंदोलनाचे नेतृत्व संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष योगिता बलाक्षे, सचिव विवेक राऊत, सदस्य शिवकरण गोसावी, पराग चाटोरीकर, नामदेव गवळी, सुनील दराडे, संजय अकोले, दिलीप बघेले, सचिन तांबे, चांगदेव सोरते, वशिष्ठ खोब्रागडे, सुरेंद्र खोब्रागडे, लक्ष्मीकांत पोतोडे, नीता देशमुख, केरबा कांबळे, विनोद परतेके, सुनील राऊत, सतिश बावणकर सह प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष यांनी केले आहे.







