सकारात्मक शिस्त’ या विषयावर जिल्हास्तरीय विशेष सत्राचे आयोजन ; जिल्ह्यातील सर्व पर्यवेक्षीय यंत्रणेला मार्गदर्शन…
♦️जिल्ह्यातील तालुका व प्रत्येक केंद्रावर होणार डिसेंबर महिन्यात विशेष शिक्षण परिषद..

♦️ जिल्ह्यातील तालुका व प्रत्येक केंद्रावर होणार डिसेंबर महिन्यात विशेष शिक्षण परिषद
गोंदिया, (दि. ४): राज्यातील काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांवरील शारीरिक शिक्षेच्या घटना समोर येत असून समाजात याविषयीची चिंता व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, सुरक्षा आणि शिक्षक-विद्यार्थी नाते बळकट करण्यासाठी सकारात्मक शिस्त ही संकल्पना अत्यावश्यक आहे. त्या अनुषंगाने, राज्यातील सर्व जिल्हे, तालुके अथवा केंद्रस्तरावरील शिक्षण परिषदांमध्ये नोव्हेंबर च्या शेवटच्या आठवडयात किंवा डिसेंबर च्या पहिल्या आठवडयात ‘सकारात्मक शिस्त’ या विषयावर किमान ४५ मिनिटांचे विशेष सत्र आयोजित करण्याबाबत मा. मंत्री महोदय (शालेय शिक्षण) यांनी निर्देश दिले आहेत. अनुषंगाने गोंदिया जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी (शिक्षण ), व केंद्रप्रमुख यांची एक दिवशीय जिल्हास्तरीय कार्यशाळा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य राजकुमार हिवारे व जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी विशाल डोंगरे यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आली.


जिल्हास्तरीय कार्यशाळेचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी विशाल डोंगरे यांनी करून सकारात्मक शिस्त या विषयासह शालेय विद्यार्थी सुरक्षा, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा, SQAAF, विविध विषयावर मार्गदर्शन केले. तदनंतर डायट प्राचार्य राजकुमार हिवारे यांनी शालेय शिक्षेचे विविध उदाहरणे देत पिपिटी द्वारे सकारात्मक शिस्त या विषयावर सविस्तर असे मार्गदर्शन केले. तसेच प्रत्येक केंद्रावर विशेष शिक्षण परिषदेचे आयोजन करून त्यामध्ये ४५ मिनिटाचे *सकारात्मक शिस्त* या सत्राचे आयोजन करण्याचे आवाहन केले.
कार्यशाळेत डॉ. नरेश वैद्य, वरिष्ठ अधिव्याख्याता डायट गोंदिया यांनी विद्याअंजली, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या विषयावर मार्गदर्शन केले. SQAAF बाबत सविस्तर माहिती समग्र शिक्षा चे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी दिलीप बघेले यांनी दिली. जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी (शिक्षण) एन. जी. डहाके यांनी दिनांक २६ जानेवारी २०२६ ला होणाऱ्या देशभक्तीपर गाण्यावर कवायत संचालन, हिंद की चादर, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा, माजी विद्यार्थी संघ स्थापना, मराठी भाषा अनिवार्य, राज्य गीताचे गायन, जिल्हा अटल क्रीडा व सांस्कृतिक संमेलन इत्यादी विषयावर सविस्तर असे मार्गदर्शन केले.
कार्यशाळेचे संचालन व आभार जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे विषय साधनव्यक्ती वशिष्ठ खोब्रागडे यांनी केले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी साधनव्यक्ती बी. डी. चौधरी, अनिता ठेंगडी व उर्मिला वैद्य यांनी विशेष सहकार्य केले.







