विद्युत सुरक्षा, ऊर्जा बचत अन् हरित ऊर्जेचा विद्यार्थ्यांना संदेश
देवरीतील पीएमश्री जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये विशेष मार्गदर्शन कार्यक्रम

देवरी : विद्यार्थ्यांमध्ये विद्युत सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासोबतच ऊर्जा बचत, हरित ऊर्जा आणि पर्यावरण संवर्धनाची भावना रुजविण्याच्या उद्देशाने पीएमश्री जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, देवरी येथे दि. 17 सप्टेंबर 2026 रोजी विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
“सुरक्षित वीज वापर – सुरक्षित जीवन” या संकल्पनेतून आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात विद्युत उपकरणांचा सुरक्षित वापर कसा करावा, विद्युत अपघात टाळण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी, विद्युत तारांपासून व उपकरणांपासून सुरक्षित अंतर का ठेवावे, तसेच विद्युत सुरक्षेचे आवश्यक नियम याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी “ऊर्जा बचत हीच ऊर्जा निर्मिती” या संदेशावरही विशेष भर देण्यात आला. गरज नसताना दिवे, पंखे व इतर विद्युत उपकरणे बंद ठेवणे, विजेचा अनावश्यक वापर टाळणे आणि ऊर्जेचा काटकसरीने वापर करण्याच्या सवयी विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात अंगीकाराव्यात, असे आवाहन करण्यात आले.
सौर व पवन ऊर्जेचे महत्त्व पटवून दिले
कार्यक्रमात हरित ऊर्जेचे महत्त्व स्पष्ट करताना सौरऊर्जा, पवनऊर्जा यांसारख्या पुनर्नवीनीकरणक्षम ऊर्जास्रोतांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. स्वच्छ, सुरक्षित आणि शाश्वत ऊर्जेचा वापर वाढविणे ही भविष्यातील गरज असून, पर्यावरण संवर्धनात विद्यार्थ्यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे मार्गदर्शकांनी सांगितले.
कार्यक्रमाचे मार्गदर्शन उपकार्यकारी अभियंता श्री. अतुल बोकाडे, सहाय्यक अभियंता सौ. नम्रता कळमकर, सहाय्यक अभियंता सौ. वर्षा गढवाल आणि सहाय्यक अभियंता, देवरी विभाग, महावितरण सौ. संघमित्रा वासनिक यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देत विद्युत सुरक्षा, ऊर्जा बचत आणि हरित ऊर्जेबाबत व्यवहार्य माहिती दिली.
कार्यक्रमास शाळेचे प्राचार्य एच पी दराडे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमानउल्ला खान, व सर्व सदस्य, तसेच शिक्षक – अमोल सव्वासे, खंदारे, कमलाकर, शहारे, खंडाईत उपस्थित होते.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विद्युत सुरक्षेबाबत जागरूकता, ऊर्जा बचतीची सवय आणि पर्यावरण संवर्धनाची सकारात्मक दृष्टी निर्माण होण्यास मदत झाली. कार्यक्रमाचे संचालन शिक्षक डिलेश टेटे व आभार श्रीमती दहिफळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक – अमोल सव्वासे, खंदारे, कमलाकर, शहारे, खंडाईत यांनी मेहनत घेतली.
“वीज वाचवा – ऊर्जा वाचवा;
ऊर्जा वाचवा – पर्यावरण वाचवा;
पर्यावरण वाचवा – भविष्य सुरक्षित करा!”
या संदेशाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.







