शिक्षण विभागातील कर्मचारी व अधिकारी यांच्या विविध स्पर्धा जिल्ह्यात सुरु; जिल्ह्यातील शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
🔺एकूण 43 स्पर्धा होणार ; जिल्ह्यातील 6421 शिक्षक कर्मचाऱ्यांनी केली नोंदणी.

🛑 गटशिक्षणाधिकारी व गट समन्वयक यांच्या नियंत्रणात सर्व तालुक्यात स्पर्धाचे आयोजन…
गोंदिया, (दि. 08): राज्यातील राज्य मंडळाच्या अधिनस्त असणाऱ्या सर्व शाळांमधील शिक्षक व अधिकारी / कर्मचारी यांच्यामध्ये शैक्षणिक, प्रशासकीय कौशल्य वृद्धिंगत करणे, त्यांच्यात समन्वय, सहकार्य व स्पर्धात्मकतेची भावना निर्माण करणे तसेच त्यांच्या डिजिटल, भाषिक व सादरीकरण कौशल्यांना चालना देण्याच्या उद्देशाने तालुका, विभाग व राज्य स्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने आज (7 नोव्हेंबर) पासून क्रीडा स्पर्धांना राज्यात सुरुवात झाली. गोंदिया जिल्ह्यात देखील आठही तालुक्यात क्रीडा स्पर्धांना सुरुवात झाली असून गटशिक्षणाधिकारी व गट समन्वयक यांच्या नियंत्रणात सर्व स्पर्धा होत आहेत. अशी माहिती जिल्ह्याचे नोडल अधिकारी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे (डायट ) प्राचार्य राजकुमार हिवारे सह वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. नरेश वैद्य यांनी दिली.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे च्या निर्देशांन्वये एकूण 43 प्रकारच्या विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले असून सर्व शिक्षक अधिकारी व कर्मचाऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यात आली. गोंदिया जिल्ह्यातून शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन क्रीडा स्पर्धेमध्ये 1545 शिक्षकांनी नोंदणी केली. खोखो, व्हॉलीबॉल असे सांघिक खेळ तर बॅडमिंटन, गोलाफेक, थाळीफेक, रनिंग, लांब उडी भालाफेक, शैक्षणिक साहित्य निर्मिती व हाकेथॉन इत्यादी स्पर्धा जिल्ह्यातील सर्व आठही तालुक्यात उत्साहपूर्ण वातावरणात शांततेत शुक्रवारी व शनिवारी पार पडल्या. शिक्षकांनी क्रीडा स्पर्धेत सहभाग नोंदवून पुन्हा आपल्या विद्यार्थी जीवनाला उजाळा दिला. तालुकास्तरावरील सर्व विजयी चमू व स्पर्धक हे विभागीय स्पर्धेत जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहेत.
क्रीडा स्पर्धा क्षणचित्रे-

शैक्षणिक साहित्य निर्मिती क्षणचित्रे-

तालुक्यातील स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरूगानंथम यांचे मार्गदर्शनात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य राजकुमार हिवारे, वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. नरेश वैद्य, शिक्षणाधिकारी (प्राथ.) विशाल डोंगरे यांच्या सहकार्याने सर्व गटशिक्षणाधिकारी, गट साधन केंद्राचे गट समन्वयक, सर्व विषय साधनव्यक्ती, विस्तार अधिकारी (शिक्षण), केंद्रप्रमुख व निवडक उत्कृष्ट शिक्षक हे विशेष मेहनत घेत आहेत.







