जिल्हा परिषद शाळांना प्रधान सचिवांची भेट; शैक्षणिक गुणवत्तेसह विविध सुविधांची केली पाहणी
♦️ शालेय शिक्षण प्रधान सचिव तथा जिल्हा पालक सचिव रणजित सिंह देओल यांचा गोंदिया दौरा...


गोंदिया, (दि. 16): महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल हे गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी आज (16) सकाळी 11 वाजता तिरोडा तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गोंडमोहाडी व गोंदिया तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खर्रा येथे भेट देऊन शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, विद्यार्थी गुणवत्ता व विविध विषयावर चर्चा केली.

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गोंडमोहाडी येथे प्रधान सचिव श्री देओल यांनी सर्व वर्गांमध्ये भेट देऊन विद्यार्थ्याशी संवाद साधला तसेच शालेय परिसर, संगणक लॅब, पोषण आहार, शालेय परसबाग, वर्गनिहाय गुणवत्ता तपासणी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, संगणक लॅब, शालेय पोषण आहार योजना, हॅन्डवाश स्टेशन, शौचालय सुविधा,शालेय भौतिक सुविधा, शालेय रेकॉर्ड इत्यादी बाबतीत माहिती घेऊन समाधान व्यक्त केले.

वेलडन खर्रा : दुर्गम व प्रतिकूल परिस्थितीत वावरणाऱ्या आदिवासीबहुल खर्रा वस्तीत शिक्षणाचं अंकुर पेरणाऱ्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खर्राला महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल यांनी भेट देऊन *’वेल्डन खर्रा’* असा कौतुकाचा शेरा देऊन शिक्षक व गावकऱ्यांचे कौतुक केले.
खर्रा शाळा गुणवत्तापूर्ण घडविण्यामागे शिक्षक नरेंद्र गौतम यांचा मोलाचा वाटा आहे. या शिक्षकाची आता ऑनलाईन बदली प्रक्रियेत दुसऱ्या शाळेत बदली झाली असल्याने सदर शिक्षकाची बदली रद्द करून त्यांना खर्रा येथेच ठेवण्यात यावे अशी भावनिक विनंती खर्रा गावचे सरपंच सरपंच विकास शेंद्रे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आशिष येडे उपाध्यक्ष व इतर गावकरी यांनी केली.
गोरेगाव हायस्कुल मधील फ्युचरिस्टिक लॅब ची केली पाहणी: आपल्या परतीच्या प्रवासात प्रधान सचिव श्री देओल यांनी शहीद जान्या तिम्या जिल्हा परिषद हायस्कुल येथील फ्युचरिस्टिक लॅब ला भेट देऊन पाहणी केली व या लॅब चा उपयोग सर्व विद्यार्थ्यांना करून विज्ञान विषयक गोडी निर्माण करावी अशी सूचना दिली. जिल्ह्यात अशा 8 फ्युचरिस्टिक लॅब निर्माण करण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरूगानंथम यांनी दिली.

याप्रसंगी त्यांचेसोबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरूगानंथम, नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालक माधुरी सावरकर, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य राजकुमार हिवारे, शिक्षणाधिकारी (प्राथ.) सुधीर महामुनी, वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. नरेश वैद्य, उपशिक्षणाधिकारी (योजना) श्री जाधव, तिरोडा गटशिक्षणाधिकारी अरुण गिऱ्हेपुंजे, गोंदिया गटशिक्षणाधिकारी एम. एल. मेश्राम, शिक्षण विस्तार अधिकारी अशोक बरईकर, डी. बी. साकुरे, PMSHRI जिल्हा समन्वयक बाळकृष्ण बिसेन, साधनव्यक्ती वशिष्ठ खोब्रागडे उपस्थित होते.







